*निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत अप्रत्यक्षपणे चुका झाल्याचे मान्य करत नजरचुकीने झालेल्या चुका या दुरुस्त करण्यात येतील व मतदारांमध्ये झालेला संभ्रम दूर करण्यात येईल असे राजकिशोर मोदी यांना सांगितले.*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- नुकतीच अंबाजोगाई शहरातील प्रभागाची फेररचना नगर परिषद प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे. या प्रभागाच्या फेररचनेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये मतदाराच्या नावांची बहुतांश ठिकाणी आदलाबदल करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली मतदारांची आदलाबदल ही त्या त्या मतदारांना सुद्धा अमान्य असल्याची तक्रार मतदार करत आहेत. त्यामुळे जाहीर करण्यात आलेली प्रभागरचना व प्रारूप मतदार याद्या या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री , मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी बीड, पालकमंत्री बीड, तहसीलदार अंबाजोगाई तसेच मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन सादर करताना यावेळी राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, मनोज लखेरा, महादेव आदमाने, धम्मा सरवदे, हाजी महमूद ,सुनील वाघाळकर , कचरू सारडा, मोईन शेख, अकबर पठाण यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार विलास तरंगे तसेच मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी निवेदन स्वीकारले.
उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाने राजकीय दबावापोटी व त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना व मतदार याद्या तयार केलेल्या दिसून येत आहेत. प्रत्येक यादीमध्ये किमान २०० ते ५०० नावांची अफरातफर किंवा आदलाबदल केली आहे. शहरातील सर्वात मोठा गणल्या जाणारा प्रभाग क्रमांक १५ यामध्ये ४८०० मतदार दाखवले आहेत. तर दोन सदस्य असलेल्या प्रभागात ५८०० पेक्षा जास्त मतदार सामील केले आहेत. याबाबत मतदारांत संभ्रम निर्माण होत आहे. अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन काम करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांतुन केल्या जात आहे. त्याचबरोबर काही प्रभागात ग्रामीण भागातील तथा शहराबाहेरील जसे की जोगाई वाडी व अन्य ठिकाणची ३००० ते ४००० नावे समाविष्ट केल्याचे आढळुन येत आहे. ती नावे वगळण्यात यावीत अशी मागणी देखील राजकिशोर मोदी यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
दोन सदस्य असलेल्या प्रभागात (प्रभाग क्र. १२) ५८४९, (प्रभाग क्र. १०) ५५३०, (प्रभाग क्र. ४) ५४१२, (प्रभाग क्र. १)५३०३ असे मतदार दर्शविले आहेत. तर तीन सदस्य असणाऱ्या प्रभागात केवळ (प्रभाग क्र. १५) ४८७६ मतदार दर्शविले आहेत. त्यावरून असे निर्देशित होते की, हेतूपुरस्कर रित्या ज्या प्रभागात सत्ताधाऱ्यांना विरोध होणार आहे अशा प्रभागात कमी मतदार दर्शविले आहेत. तर विरोधकांच्या प्रभागात जास्तीत- जास्त मतदार नोंदविण्याचा प्रकार घडविण्यात आलेला असल्याचे दिलेल्या निवेदनात राजकिशोर मोदी यांनी नमूद केले आहे. तेंव्हा मतदार संख्येत केलेली ही असमानता आश्चर्य जनक असून, त्यावर मा. निवडणुक निर्णय अधिकारी साहेबांनी गांभीर्याने विचार करावा. असे न झाल्यास पुढील ८ दिवसात अमरण उपोषण किंवा अन्य कायदेशीर मार्गाचा पर्याय निवडावा लागेल असा इशारा मोदी यांनी निवेदना द्वारे दिला आहे.
अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन तथा निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये तसेच मतदार याद्यामध्ये केलेली असमानता तात्काळ दुरूस्त करण्यासाठी संबंधितास आदेशीत करण्याचे आवाहन राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना प्रा शैलेश जाधव, जावेद गवळी, ऍड दयानंद लोंढाळ, अनिल पसारकर, बबन पाणकोळी, अशोक देवकर, काझी खयामोद्दिन , गोविंद पोतंगले, रशीद भाई,सय्यद ताहेर, सचिन जाधव, दत्ता सरवदे, शाकेर काझी, अकबर पठाण, भीमसेन लोमटे, मतीनं जरगर, राम घोडके, मुन्ना पठाण, सुदाम देवकर, सुशील वाघमारे, महेबूब गवळी, दत्ता हिरवे, रफिक गवळी, जमदार पठाण, आकाश कऱ्हाड, शुभम लखेरा, अक्षय परदेशी, शरद काळे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.