
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ती निवडणूक होती २०११ सालची. राजकिशोर मोदी त्यावेळेस कॉंग्रेस पक्षात होते. त्यावेळेस जिल्ह्यातील कॉंग्रेस जिवंत ठेवण्याचे आणि वाढविण्याचे काम मोदींनीच केले होते. परंतु, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत विरोधकांनी वरिष्ठांना हाताशी धरून तिकीट वाटपावरून मोदींना कोंडीत पकडले. अनेक प्रयत्न करूनही तडजोड न झाल्याने राजकिशोर मोदींनी धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे अंबाजोगाई विकास आघाडी करून निवडणूक लढविण्याचा. चिन्हवाटपात मोदींच्या शहरविकास आघाडीला ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले. प्रचारला कमी कालावधी असतानाही मोदींची ‘कपबशी’ अल्पावधीतच जनमानसात रूजली. त्यावेळी त्यांच्यासमोर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी सारखा तगडा पक्ष होता. तत्कालीन मंत्री स्व.डॉ.विमलताई मुंदडा या तत्कालीन मंत्रीपदावर असल्यामुळे राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. त्यातच पक्षांतर्गत विरोधामुळे कॉंग्रेसकडून लढणारे उमेदवारही मैदनात आले. अशा परिस्थितीत राजकिशोर मोदी एकटे पडले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा झाल्या. मतदारांवर मोदी विरोधी जाहिरातींचा, अफवांचा मारा होऊ लागला. विरोधकांकडून पाण्यासारखा पैसा ओतला गेला.
राजकिशोर मोदींच्या आघाडीला ४-५ जागा सुद्धा मिळणार नाहीत, मोदी स्वतःसुद्धा पडणार, मोदींचे राजकारण संपले अशा चर्चा झडू लागल्या. मात्र मोदी डगमगले नाहीत, मात्र त्यांनी अंबाजोगाईकरांच्या भक्कम पाठबळ, आशीर्वाद, विश्वास आणि सहकार्यामुळे निकराने लढा दिला. अंबाजोगाईची जनता शांतपणे हे सर्व पाहत होती, मात्र मतपेटीत काय टाकायचे हे त्यांनी मनोमन ठरवले होते. अखेर निवडणूक पार पडली.. आणि आश्चर्य..! अंबाजोगाईच्या सुजाण जनतेनेही नगराध्यक्षपदासह २८ पैकी २० जागा मोदींच्या पारड्यात टाकत इतिहास घडवला. यावेळी राष्ट्रवादीला ६ तर भाजपला अवघी एक जागा मिळाली. कॉंग्रेसचा तर भोपळाही फुटला नाही. मोदींना ‘कपबशी’ अतिशय लकी ठरली होती. या निवडणुकीत ही त्याची पुनरावृत्ती होणार हे निश्चित आहे.
आज राजकिशोर मोदींची परिस्थिती जवळपास २०११ सारखीच आहे. २०२१ पासून मोदी सत्तेत नाहीत. त्यामुळे लोकांच्या आठवणीत राहतील अशी दाखविण्यासाठी नजीकच्या काळातील विकासकामे नाहीत. पूर्वीच्या विकास कामांवर मधील काळात दुसरी कामे झाली आहेत. त्यातच मोदी स्वतः आता राष्ट्रवादीत आहेत तर त्यांचे विरोधक नंदकिशोर मुंदडा हे भाजप मध्ये आहेत. मुंदडा यांच्याकडे आमदारकीच्या माध्यमातून सत्ता आहेच. मोदींचे सर्व डावपेच ओळखून असलेल्या मुंदडा यांनी मागील ९ वर्षांपासून मोदींना विविध मार्गांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, काहीही चुकीचे केलेले नाही. म्हणून मोदी ठामपणे विरोधकांचे खोटे आरोप फेटाळून लावत आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच दोघेही आघाड्या करून लढत आहेत. यावेळी मुंदडा यांनी मोदी यांच्या अनेक सहकार्यांना स्वतःकडे घेत त्यांना एकटे पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदींवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. मुंदडा यांच्या तगड्या सोशल मीडिया टीमने कार्टून, व्हिडिओ क्लिप, आधुनिक प्रचार क्लुप्त्या वापरून मोदींची प्रतिमा डागाळण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू ठेवला आहे, पण, तसे काही होणार नाही. मोदी पराभूत होणार आहे अशी जोरदार वातावरण निर्मिती सोशल मीडियावर आहे. पण, प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोदींच्या उमेदवारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू होते. स्वतःच्या आघाडीच्या निवडणुक चिन्हासाठी मुंदडा यांनी जाणीवपूर्वक ‘कपबशी’ला प्रथम प्राधान्य दिले. परंतु, पुन्हा एकदा नशिबाने मोदींच्या बाजूने कौल दिला. सोडतीमध्ये कपबशी मोदींनाच मिळाली. त्यामुळे मोदी यांच्यासह सर्व टीमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा आत्मविश्वास मोदी आणि कार्यकर्त्यांत आहे. २०११ प्रमाणेच मोदी निकराने लढत आहेत, सोशल मीडियावरील चर्चेकडे लक्ष न देता सुप्तपणे त्यांचा प्रचार सुरू आहे. आजच्या अटीतटीच्या लढतीत २०११ प्रमाणेच ‘कपबशी’ हे चिन्ह राजकिशोर मोदी आणि लोक विकास महाआघाडीला लकी ठरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
