
घटनेच्या वेळी सोबत असलेल्या फरार व्यक्तीचा पोलीस घेतायत शोध
अंबाजोगाई प्रतिनिधी:
येथील नामांकित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापिका डॉ. ममता राठी (जाखोटिया) यांनी रविवारी दुपारी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळगाव शिवारात स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले असून या घटनेच्या वेळी डॉक्टर राठी यांच्या समवेत असलेल्या फरार व्यक्तीचा शोध बर्दापूर पोलीस घेत आसल्याने या प्रकरणाचे गूढ रहस्य वाढले आहे.
या विषयी हाती आलेले वृत्त असे की अंबाजोगाई शहरातील परळी रोड वरील कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापिका डॉक्टर ममता राठी या रविवारी बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील जवळगाव मार्गे लातूरकडे जात असताना त्या कशा पेटल्या याविषयी अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी या भिशन घटनेत त्या ८० टक्क्यांहून अधिक भाजल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी सोमवारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आसता घटनेच्या वेळी त्यांच्या समवेत आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान, ममता राठी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कौटुंबिक कलह, कामाचा मानसिक ताण किंवा अन्य काही गंभीर कारणांचा शोध सुरू केला आहे.
बर्दापूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून या घटनेशी संबंधित असलेली व्यक्ती मोबाईल बंद करून सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्या फरार व्यक्तीचा शोध घेत असून लवकरच या आत्महत्येच्या प्रयत्ना मागील गूढ उकलण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
