
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसूबाई शिखरावर तब्बल ७७ फूट लांबीचा तिरंगा फडकावून आई सेंटर प्रो च्या तरूणांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. अशी माहिती प्रा.सर नागेश जोंधळे यांनी दिली आहे.
७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखर कळसूबाईवर ७७ फूट लांबीचा भारतीय तिरंगा फडकवून एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. या राष्ट्रभक्तीपूर्ण मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या २२ हून अधिक गिर्यारोहकांसह कळसूबाई येथील उपस्थित सुमारे १०० हून अधिक गिर्यारोहकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. या ऐतिहासिक उपक्रमासाठी आई सेंटर प्रो चे संचालक प्रा.सर नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे ऍड.राहुल बनसोडे, तसेच आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे (नंदुरबार) यांच्या नेतृत्वात हा विक्रम यशस्वीरीत्या साकारण्यात आला. कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकावल्यानंतर उपस्थित सर्व गिर्यारोहकांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. तसेच राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून भारतीय ध्वजास मानवंदना दिली. या ऐतिहासिक क्षणी विश्वविक्रमवीर तथा प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे यांनी तरूणांना संबोधित करताना आपल्या भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार तसेच ती अबाधित राहण्यासाठी राष्ट्रप्रेम, एकता, समानता व एकमेकांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करण्यासाठी प्रेरित केले. यशोशिखर सर केल्यानंतरचा अभिमानाने भारावलेला हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी आई सेंटर प्रो चे युवा समन्वयक प्रतीक गौतम, पल्लवी माने, इंग्लिश विंग्स प्री-स्कूलच्या प्राचार्या स्वाती वाकळे, राहुल घायमुक्ते, सुमित खोत, धम्मदीप वैद्य, श्रेया ढोले, यश जोंधळे, समर्थ साखरे, नयन जाधव, सक्षम वाघमारे, अभिषेक चाटे, संजय कुमार यांच्यासह केवळ तीन वर्षीय आर्यांश जोंधळे याचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या गिर्यारोहकांच्या उपस्थितीने हा उपक्रम केवळ विक्रमापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय एकात्मता, युवा नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रभावी प्रतीक ठरला हे विशेष होय.
*राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश :*
प्रजासत्ताक दिनी कळसूबाई शिखरावर ७७ फूट तिरंगा फडकवताना प्रत्येकाला अभिमान वाटत होता यासोबतच संविधान मूल्ये, युवक सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न होता. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या युवकांनी एकत्र येऊन देशासाठी उभं राहणं, हाच या उपक्रमाचा खरा सामाजिक अर्थ आहे.
*- ऍड.राहुल बनसोडे (नाशिक)*
*एक रोमांचकारी अनुभव..!*
कळसुबाई शिखरावर जाणे हा आम्हा सर्वांसाठी एक खडतर परंतु, रोमांचकारी अनुभव होता. माझ्या आयुष्यात प्रथमच मी हा ट्रेक केला. प्रवास दमवणारा, स्वतःच्या क्षमता तपासणारा आहे. परंतु, शिखरावर जाऊन सर्वांत लांब तिरंगा फडकवल्यानंतर माझा आत्मविश्वास प्रचंड दुणावला. या संस्मरणीय अनुभवासाठी मी सृजनशील व्यक्तिमत्व तथा मेंटाॅर सर नागेश जोंधळे व आई सेंटर टीमचे ऋणी राहील.
*- कु.पल्लवी माने,*
(राष्ट्रीय युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त)
*राष्ट्रनिष्ठा जागवणारा उपक्रम :*
या महत्वकांक्षी मोहिमेत सहभागी प्रत्येक चेहऱ्यावर देशप्रेम स्पष्ट दिसत होतं. एक सजग मेंटाॅर म्हणून युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा जागवता आली, याचा मनापासून आनंद आहे. इतक्या लहान वयात मुलांनी तिरंग्याकडे पाहून अनुभवलेला अभिमान त्यांच्या आयुष्यभर देशप्रेमाची प्रेरणा देईल, अशी माझी ठाम खात्री आहे
