
अंबाजोगाई प्रतिनिधी –
अंबाजोगाई शहरातील बस स्टेशन–सावकार चौक परिसरात असलेली पोलिसी चौकी ही केवळ नावापुरतीच उरल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर चौकीवर बहुतांश वेळा कुलूप लावलेले असल्याने परिसरातील वाहतूक पूर्णपणे अनियंत्रित होत आहे. याचा थेट फटका प्रवासी, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या चौकातून दररोज शेकडो वाहने, एसटी बसेस, रिक्षा व खासगी वाहतूक मार्गक्रमण करते. मात्र पोलिसांची उपस्थिती नसल्याने वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. चुकीच्या पद्धतीने पार्किंग, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, रस्त्यावर अडथळा निर्माण होणे यामुळे वारंवार कोंडीची स्थिती निर्माण होत आहे. अपघाताचा धोका देखील वाढला असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
“चौकी आहे पण पोलिस नाहीत” अशी चर्चा नागरिकांत होत असून, या पोलिसी चौकीचा प्रत्यक्ष उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या वर्दळीच्या वेळेत तरी चौकी कार्यरत ठेवावी, वाहतूक पोलीस नेमावेत व नियमित नियंत्रण ठेवावे, अशी ठाम मागणी जनतेतून होत आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पोलिसी चौकी नियमितपणे सुरू करावी, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडल्यास जबाबदारी कोणाची? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
