अंबाजोगाई (प्रतिनिधी) – शहरात चारचाकी वाहनातून विक्रीसाठी नेला जात असलेला सुमारे 13 लाख 70 हजार 860 रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखा व अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून 28 किलो गांज्यासह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. त्यानुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंबाजोगाई येथील सटवाजीनगर परिसरातील ड्रीमसिटी भागात चारचाकी वाहनातून गांजाची अवैधरित्या वाहतूक होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह सटवाजीनगर, ड्रीमसिटी येथील सिमेंट रस्त्यावर सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता, वाहनामध्ये दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यांमध्ये पान, फुल, बिया व बोंड असलेला उग्र वासाचा ओलसर गांजा आढळून आला. वजन केल्यावर सुमारे 28 किलो गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रतीम राम तरकसे (वय 27, रा. आडस, ता. केज, जि. बीड) याच्यासह प्रतिक भगवान पाटोळे, अजय पाटोळे (दोन्ही रा. आसरडोह, ता. धारूर, जि. बीड) व अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 83/2026 कलम 20, 8 (सी) गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहायक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनििरीक्षक सुशांत सुतळे व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
