अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
अंबाजोगाई उपविभागातील ग्रामीण भागातील पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी घेतली जाणारी लेखी व तोंडी परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पडत असून संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येत आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकारची तक्रार राहू नये यासाठी प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेतली जात असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे,व तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितले की, पोलीस पाटील पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. लेखी परीक्षा, कागदपत्रांची तपासणी तसेच तोंडी मुलाखत या सर्व टप्प्यांमध्ये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

उमेदवारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल याची हमी प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आवाहन करताना सांगितले की, “कोणीही ‘हे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, तुमचा वशिला लावून देतो’ अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. शांततेत व प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे,” असे आवाहन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे BDO कैलास बळवंत, एपीआय संदीप मांजरमे (केज), तसेच अंबाजोगाई चे तहसीलदार विलास तरंगे तसेच समृद्धी सुरेश भवरे (गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, अंबाजोगाई) आदी उपस्थित होते. पोलीस पाटील भरतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली जाईल, असा विश्वास उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी व्यक्त केला.
