अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अंबाजोगाई येथे एक कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गंभीर प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात कार्यरत असलेल्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सहगुत्तेदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी रेखा उत्तम वंजारे (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई) यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चांगदेव शेप यांच्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेने शासकीय कार्यालयांमध्ये कंपनीविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्या मागे घेण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांची मागणी केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभाग, बीड जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कोकण भवन येथील महामार्ग विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींच्या प्रती व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून कंपनीची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, प्रत्यक्ष भेटी आणि फोन कॉलद्वारे वारंवार संपर्क साधत पैशासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचे ऑडिओ रेकॉर्डिंगसह पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत.
दरम्यान, आरोपी महिला भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची तालुका संघटक असल्याचे समोर आले असून, पदाचा गैरवापर करून अशा प्रकारे खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे विविध संघटनांच्या नावाखाली शासकीय अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
