अंबाजोगाई (प्रतिनिधी)
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ज्येष्ठ राजयोगिनी आदरणीय गीता बहेनजी यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देत निधनानिमित्त रविवारी ब्रह्माकुमारीज, आनंद सरोवर, ओमशांती मार्ग, वाघाळा रोड, अंबाजोगाई येथे विशेष श्रद्धांजली सभा संपन्न झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून गीता बहेनजींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

मृदुभाषी, स्नेहमयी आणि त्याग की, प्रतिमूर्ती असलेल्या ज्येष्ठ राजयोगिनी गीता बहेनजी यांनी आयुष्यभर शांतता, पावित्र्य आणि नैतिक मूल्यांचा प्रचार केला. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी रविवार, दिनांक २२ मार्च रोजी आयोजित शोकसभेतून व्यक्त करण्यात आली. शोकसभेची सुरूवात सामूहिक मौन पाळून आणि बहेनजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक करताना अंबाजोगाई सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनिता दीदी म्हणाल्या की, गीता बहेनजींचे संपूर्ण जीवन हे त्याग आणि सेवेचे प्रतीक होते. त्यांनी हजारो कुटुंबांना व्यसनमुक्ती आणि तणावमुक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आणि मार्गदर्शन समाजासाठी नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे कार्य करेल. गीता बहेनजी यांचे जीवन खऱ्या अर्थाने त्यांच्या नांवाला साजेसे आहे. त्या एक प्रभावी आणि प्रेरणादायी शिक्षिका, एक निष्णांत प्रशिक्षक होत्या, त्यांना व्यवस्थापनाचा दांडगा अनुभव होता, त्यांनी आयुष्यभर ईश्वरीय ज्ञान आणि राजयोगाचा प्रसार करून असंख्य जीवांना लाभान्वित केले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मागील अनेक वर्षांपासून आपल्या समर्पित सेवेद्वारे असंख्य जीवांना ज्ञान आणि योग यांनी सातत्याने समृद्ध केले आहे. गीता दीदी यांनी आयुष्यातील कांही क्षण आरामाची अनुभुती घेण्यासाठी आनंदसरोवर अंबाजोगाई निवडले. आनंदसरोवर पाहून त्यांना आईने लेकीचं घर पहाण्याचा आनंद अंबाजोगाईत आल्यावर अनुभवता आला. संपूर्ण पॉवरफुल स्थितीत त्यांनी सर्वांना स्नेह व आशिर्वाद दिले. त्याग, तपस्या, सेवा समान ठेवत त्यांची ही सर्वांशी अंतिम सेवा भेट ठरली. विशेष वरदान स्नेह व ज्ञान देऊन त्यांनी आपणांस परिपूर्ण केले. दीदींच्या डायरेक्शन प्वाइंट्सने, स्पर्शस्नेहाने आपणांस यशस्वी वाटचालीची ऊर्जा मिळाली. आजच्या डिजिटल प्रेमा पेक्षा हे आंतरिक प्रेम हे चिरंतर फलदायी आहे अशा गौरवपूर्ण शब्दांत ब्रह्माकुमारी सुनिता दीदी यांनी आपल्या शोकभावना प्रकट केल्या. तर उदगीर सेवा केंद्राच्या संचालिका महानंदा दीदी यांनी यावेळी बोलताना आपला पुरूषार्थ आपल्या अवस्थेवर अवलंबून असल्याचे सांगितले. आपण पुरूषार्थीसह सेवाभावी सुद्धा आहोत. वर्तमान परिस्थिती धन समस्येसह आपसांत टकराव/ हेवेदाव्याने समस्यांत वाढ होत आहे. आपण कारणचे निवारण, समस्याचे समाधान मध्ये परिवर्तन करून आपण स्वत: समस्या मुक्त बनावे आणि इतरांना ही समस्यामुक्त बनवावे. आपण स्वत: कधीही समस्येचे कारण बनू नये. आनंदाच्या टाळ्या चिरकाल आनंददायी राहतात. राजयोगिनी गीतादीदी या मित व ज्ञान भाषी होत्या. त्यांनी बाबांचे ज्ञानदानांसह प्रत्येक घटनेत बॅलन्स ठेवण्याची शिकवण दिली. त्यांच्या सेवेचा लाभ अंबाजोगाई पूर्वी उदगीर, परळी येथेही झालेला होता अशी आठवण ही सांगितली. तर यावेळी बोलताना वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोगीनी गीता दीदींची डायलिसिस सेवा झाली. या काळात त्यांचा आलेला संबध व त्यांचा चरणस्पर्श माझ्या जीवनातील आनंदाचा महत्वाचा क्षण असल्याचे सांगितले. या वैद्यकीय शुश्रुषावेळी गीता दीदींच्या व्यक्तीमत्वातील निरागस उदात्तपणा, ज्ञानसंपदा, असामान्य अनन्यसाधारण असलेलं शक्तीरूप अनुभवास आले. बाहेरील युद्ध सदृष्य अशांत जगात आपल्या मनातील द्वंद्व संपविण्याचे कार्य कर्तृत्वातून सर्वांमध्ये स्थिरस्वरूपता आणण्याची कृतिशीलता त्यांच्यात आढळली. दीदींनी सेवा-समर्पणात आपले जीवन सत्कारणी लावले असे गौरवोउद्गार अधिक्षक डॉ.केंद्रे यांनी काढले. याप्रसंगी बोलताना अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अजितराव लोमटे म्हणाले की, आजचा क्षण मानवतेच्या सेवेत आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या दिव्य आत्म्याच्या, जगाला शांती संदेशाचा अर्थ देणाऱ्या बहिणीच्या जीवनपर्वाची ऋणाई अर्पण करण्याचा असल्याने शब्दांच्या पलीकडचा असल्याचे मनोगतात व्यक्त केले.

दीदींनी शांततेच्या संदेशासह हजारोंना ज्ञान प्राप्ती करून दिली. मानवतेच्या कल्याणासाठी शांतस्वरूप अध्यात्म जागृतीचे कार्य हे मार्गदर्शक प्रकाश प्रकाशस्तंभ आहे. या आशयाचे मनोगत ऍड.लोमटे यांनी व्यक्त केले. या श्रद्धांजली सभेत ब्रह्माकुमारी केंद्रातील इतर साधकांनी ही बहेनजींच्या जीवनातील प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन, ब्रम्हाभोजन पुर्वी ब्रह्माकुमारी महानंदा दीदींचे मुरली वाचन आणि ईश्वरीय स्मृतीमध्ये राहून सर्वांनी त्यांना मूक श्रद्धांजली वाहिली. सुत्रसंचालन मंजु बहेनजी यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी गीता दीदींच्या आनंद सरोवर अंबाजोगाई मधील सात दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी सात जन्माचे प्रेम दिल्याची अनुभुती देत आपल्या आदरयुक्त भावविश्वाने मानवंदना दिली. तसेच ध्वनी व्यवस्था सांभाळून मंजु बहेनजी यांनी राजयोगीनी गीता दीदींच्या ओमशांती सेंटर अंबाजोगाई येथील वास्तव्याच्या सप्तदिन कार्यक्रमासह त्यांच्या जीवनावर आधारित संक्षिप्त माहितीपटाचा व्हिडीओ सर्व उपस्थितांना दाखवून सर्वांना दीदींच्या पवित्र स्मृतीने आनंद सरोवराचे रूपांतर निशब्द शांतीसागरात केले. या शोकसभेला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि समस्त ब्रह्माकुमारीज् परिवारातील परळी, रेणापूर, केज, अहमदपूर, गंगाखेड, उमरगा व कळंब येथील ब्रह्माकुमारी बहेनजी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
