अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील मांडवा रोड परिसरात एका विवाहित महिलेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि.२८ सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले सुनील चिकटकर हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात मांडवा रोडवरील शितोळे यांच्या तीन मजली इमारतीत भाड्याने राहत होते. आज सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुनील चिकटकर यांनी राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतली.

या घटनेत त्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.
दरम्यान, संबंधित महिला मानसिक आजाराने त्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
