*विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनूसार पालकांनी दृष्टिकोन बदलावा – डॉ.राजेश इंगोले*
*अंबाजोगाईत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सोहळा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राजश्री शाहू मल्टीपर्पज असोसिएशन, लातूर संचलित ढगेज् कोचिंग क्लासेस, अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित दहावी विद्यार्थी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अंबाजोगाईतील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लातूरच्या मोटेगावकर कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा प्रा.मोटेगावकर तर प्रमुख व्याख्याता म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार व शिक्षण तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मिलिंद ढगे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम बनसोडे, गणिताचे प्रा.धुळे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन आगलावे तसेच तालमार्तंड प्रा.राजकुमार ठोके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्लासेसचे संचालक प्रा.डॉ.ढगे यांनी प्रास्ताविक करताना संकुलात राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. इंग्रजी ग्रामर, रेग्युलर इंग्रजी तसेच स्तरनिहाय लेवल झिरो, लेव्हल वन, लेव्हल टू व स्पोकन इंग्लिश या अभिनव पद्धतीतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महादेव गाढवे व प्रमोद सिताप हे गणित व विज्ञान हे विषय विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे रूजवत असल्याचे सांगितले. या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नेटिजन्स प्री-प्रायमरी नॅशनल स्कूल, अंबाजोगाई या शाळेच्या प्रगतीचाही गौरवपूर्ण आढावा सादर करण्यात आला. यंदा सुरू होत असलेल्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. आपल्या उदघाटकीय भाषणात डॉ.मोटेगावकर यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. प्रगती ही केवळ गुणांची आकडेवारी नसून ती संस्कारांची शिदोरी असली पाहिजे, असे ठामपणे सांगत त्यांनी पालक-विद्यार्थी व शिक्षक-विद्यार्थी नात्यातील दृढतेवर भर दिला. कष्टाने मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधावी, असे भावनिक आवाहन ही त्यांनी केले. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक व्याख्याते डॉ.राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या वयानुसार त्यांच्या बदलत्या मानसिकतेवर सखोल भाष्य केले. आपल्या पाल्याचा हा शारीरिक, मानसिक बदल, त्यांच्या मधील हॉर्मोनल बदलामुळे त्यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत पालकांनी समजून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मागे राहण्यामागील विविध मानसिक कारणे सोप्या भाषेत विषद करीत त्यांनी पालकांनी आपल्या विचारसरणीत आवश्यक ते बदल करून विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक गरजांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासात यश मिळावायचे असेल तर त्याला त्यात आवड निर्माण झाली पाहिजे, ही गोडी निर्माण करण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अभ्यासात निर्माण झालेली आवड आणि अभ्यासातील सातत्य हीच खरी यशाची गुरूकिल्ली असल्याचे डॉ.इंगोले यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार सचिन सुमन शंकरराव आगलावे (श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई) यांना प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव गाढवे यांनी केले, तर आभार सौ.ढगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गाडवे, प्रमोद सिताप, श्रीमती के, श्रीमती कुलकर्णी, शितल साठे, श्रीमती साळुंखे, कु.सई व चि.प्रशांत ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
