अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सचिन मुरलीधर फोलाने यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. नुकतेच त्यांना मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सचिन मुरलीधर फोलाने हे अंबाजोगाई तालुक्यातील भुमीपुत्र आहेत. येथील मागील अनेक वर्षांपासून लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या समक्ष नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून युवक वर्ग आणि सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत आक्रमक आणि सातत्यपूर्ण काम करीत आहेत. त्यांच्या याच निष्ठेची आणि संघटन कौशल्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविली आहे. सचिन फोलाने हे मराठवाडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करीत आहेत. गोरगरीब नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आयोजित करणे अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे ते अव्याहतपणे समाजसेवा करीत आहेत. तसेच मागील १५ ते २० वर्षांपासून ते राजकीय क्षेत्रात ही सक्रियपणे कार्यरत आहेत, जनतेच्या विविध प्रश्नांसाठी ते व्यवस्थेशी लढत आहेत. लोकनेते पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) मध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यावर प्रदेश युवक सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्या पदावर काम करताना संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्यांच्या याच विधायक व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षाने फोलाने यांच्यावर आता युवक सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. आपल्या नियुक्ती संदर्भात बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सचिन फोलाने यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष राजेसाहेब देशमुख (माकेगांवकर) यांचे आभार मानून या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. आजचा दिवस आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरला. पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आणि विश्वासाची पावती आहे. हा सन्मान माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, मित्र परिवाराचा आणि कुटुंबाचा आहे. समाजहित आणि पक्षाच्या विचारांसाठी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही देत. आपला आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहू द्या, पुढील काळात आदरणीय पवार साहेबांचे विचार आणि पक्षाची ध्येय-धोरणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्रात युवक संघटनेची ताकद वाढविण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. या नवीन जबाबदारीला न्याय देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार असून, शेतकरी, गोरगरीब जनता आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. समाजसेवा आणि जनहित हाच माझ्या कार्याचा मुख्य ध्यास असून, पुढील काळात अधिक ताकदीने लोकांसाठी काम करण्याचा माझा संकल्प आहे असे फोलाने यांनी सांगितले. तर सचिन फोलाने यांच्या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातून आणि राजकीय वर्तुळातून स्वागत होत आहे.
