अंबाजोगाई प्रतिनिधी :
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला दुग्धव्यवसाय सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. घाऊक बाजारात ढेप, पेंड आणि कडब्याचे दर गगनाला भिडले असताना, दुधाला मिळणारा भाव मात्र ‘जैसे थे’ असल्याने अंबाजोगाई तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक कोंडीत अडकला आहे.
शेतीला पुरक असलेला व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहीतले जाते. परंतू सध्या तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि दुसरीकडे पशुखाद्याच्या दरात झालेली प्रचंड वाढ, यामुळे दुभत्या जनावरांचे संगोपन करणे पशुपालकांसाठी जिकिरीचे झाले आहे. पशुखाद्यासाठी लागणाऱ्या ढेप, पेंड आणि इतर घटकांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या सरकी पेंड २२०० ते २४०० रुपये (४० किलो), तर शेंग पेंड ४००० ते ४५०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. कडबा सिंगल कट्टीचे दरही ३५०० ते ३८०० रुपयांपर्यंत वाढल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मका कटा आणि तूर कळीसारख्या महत्त्वाच्या खाद्यांचे दर वाढल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दूध दरात तातडीने वाढ करावी किंवा पशुखाद्यावर अनुदानाच्या स्वरूपात मदत द्यावी, अशी मागणी अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जर लवकरच दरात सुधारणा झाली नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असलेला हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडू शकतो
उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि पाण्याचे संकट
वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. उन्हाळ्यामुळे चारा आणि पाण्याच्या टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जनावरांना अधिक पूरक अन्नाची गरज असते, मात्र वाढत्या महागाईमुळे खर्चाचा मेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. दुग्ध व्यावसायिक नारायण अंजान यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, योग्य भाव मिळत नसल्याने आता या व्यवसायाला पर्यायी मार्ग शोधावा का, अशी विचार करण्याची वेळ आली आहे.
दुधदरात सुधारणेची प्रतीक्षा
सध्या म्हशीच्या दुधाचा दर फॅटनुसार साधारण 80 रुपये लिटर, तर गायीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटरपर्यंत भाव मिळत आहे. पशुखाद्याच्या किमती पाहता हा दर अत्यंत अपुरा असून दुग्धव्यवसाय तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. देशी गायींच्या तुलनेत संकरित गायी आणि म्हशींचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या खुराकावर होणारा खर्च अधिक आहे.
