अंबाजोगाई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या शुक्रवार, दि. 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम आरक्षण मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
दि. 13 एप्रिल 2026 रोजी सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या पत्राद्वारे त्यांनी हा पाठिंबा घोषित केला. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राजकिशोर मोदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुस्लिम समाज हा राज्यातील मागास व वंचित घटक असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षणाची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि शासन व्यवस्थेत समतोल प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी आरक्षण हा महत्त्वाचा उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, भारतीय राज्यघटनेनुसार सामाजिक न्याय व समान संधी मिळणे हा प्रत्येक घटकाचा अधिकार असून, मुस्लिम समाजाच्या मागण्या या घटनात्मक व न्याय्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिल्याचा उल्लेख करत, भविष्यातही आरक्षणाच्या बाजूने ठाम भूमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा मोर्चा शांततामय व लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात येत असून, शासनाचे लक्ष वेधून घेऊन मुस्लिम समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यास तो उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात आपण खंबीरपणे सहभागी राहणार असल्याची ग्वाही देत त्यांनी मोर्चाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
