
आष्टी प्रतिनिधी :- तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल दरीत आढळून आले असून, यातील एका तरुणाचा केवळ सापळा उरला आहे, तर वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
गडावरील खोल दरीत सरपण गोळा करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले होते. दरीच्या दुर्गम भागात त्यांना मानवी अवशेष दिसताच त्यांनी गावात धाव घेऊन माहिती दिली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी मोठ्या शर्थीने हे मृतदेह बाहेर काढले.ओळख पटली अन् कुटुंबीयांचा आक्रोश
मयत निलेश नारायण घोंगरे (वय २६, रा. बेलापूर खुर्द, जि. अहिल्यानगर) हा महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता, पण तिथूनच तो बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी अंभोरा पोलिसात तक्रारही दिली होती. दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याची ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय ६५, रा. भिलवाडा, पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. हे भाविक भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा रस्ता चुकल्याने दरीत पडले असावेत, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, एकाच ठिकाणी दोन मृतदेह वेगवेगळ्या वेळी आढळल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव आणि सोपान येवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
