परळी/धारूर (प्रतिनिधी) – चेनस्नॅचिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी अत्यंत नियोजनबद्ध कोम्बिंग ऑपरेशन राबवून अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धारूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 01/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 204, 318(4), 319(2), 3(5) अन्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळाली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परळी येथील इराणी गल्ली परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. दि. 28 मार्च 2026 रोजी तीन विशेष पथके तयार करून रात्रीभर इराणी वस्तीत गुप्त हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. पहाटे अचानक छापा टाकत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
या कारवाईत
कंबर उर्फ डंबर शहाजहान इराणी (वय 45, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, सध्या इराणी गल्ली, परळी)
हसनैन बरकतअली मिर्झा बेग उर्फ इराणी (वय 20, रा. भिवंडी-कल्याण, जि. ठाणे, सध्या परळी)
या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपींनी धारूर येथील गुन्ह्यासह आष्टी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करता त्यांच्यावर इतर जिल्ह्यांतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, दुसरा आरोपी ठाणे जिल्ह्यातील मकोका गुन्ह्यात फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धारूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.
