27 तोळे सोने, 858 ग्रॅम चांदी हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
अंबाजोगाई प्रतिनिधी : शहरातील बंद घराचा दरवाजा तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 27 तोळे (270 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल झाली होती. फिर्यादी आपल्या कुटुंबीयांसह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 53 तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन किलो चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 391/2026, कलम 331(3), 331(4), 3(5) बीएनएस अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी अभिलेखावरील आरोपींची माहिती घेत परिसरातील ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
या तपासादरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दुचाकीवरून जाताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
परळी परिसरात सापळा; दोघे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, 25 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. सदर घरफोडीचा गुन्हा अमर काकासाहेब थोरात व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी मिळून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरी केलेले सोने विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचेही समोर आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचला. या कारवाईत अमर काकासाहेब थोरात (वय 23 वर्षे, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराचे नाव जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (वय 32 वर्षे, रा. शिवाजी चौक, परळी) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुधानी याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
युनिकॉर्न मोटारसायकलचा वापर; तिसरा आरोपी फरार
तपासादरम्यान सदर गुन्ह्यात मंगलसिंग हिरासिंग बावरी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा करण्यासाठी त्याची युनिकॉर्न मोटारसायकल वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमर थोरात, जगजीतसिंग दुधानी आणि मंगलसिंग बावरी या तिघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र मंगलसिंग बावरी सध्या फरार असून त्याचा शोध अंबाजोगाई शहर पोलीस घेत आहेत.
27 तोळे सोने व 858 ग्रॅम चांदी जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यातील 27 तोळे (270 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. चोरीला गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपींना निष्पन्न करून पुढील तपासकामी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्याकडे
या घरफोडीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत. तपासादरम्यान चोरीच्या मुद्देमालाबाबत तसेच फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.
या कारवाईत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तेजस वावळे आणि सुशांत गायकवाड यांचाही सहभाग राहिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक बीड समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, PSI सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, अर्जुन यादव, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अश्वीनकुमार सुरवसे, गोविंद राख, चालक अतुल हराळे, तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, पोलीस नाईक तेजस वावळे आणि सुशांत गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत.
