मुंबई:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वितरणादरम्यान, काही विक्रेत्यांकडून प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अवाजवी दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, असा थेट इशारा दिला आहे.
सवलतधारक प्रवाशांना डिजिटल पद्धतीने –
सवलतींचा लाभ मिळावा यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड प्रणाली लागू केली आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून दिली आहेत. नवीन कार्ड घेणाऱ्यांसाठी १९९ रुपये आणि जुन्या स्मार्ट कार्डधारकांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही विक्रेतांकडून या दरांपेक्षा जास्त पैसे आकारून प्रवाशांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मंत्र्यांचा इशारा –
या तक्रारींची दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांकडून जादा पैसे घेणाऱ्या विक्रेत्यांची अजिबात गय केली जाणार नाही. ज्या परवानाधारक विक्रेत्यांकडून अशा प्रकारे अवाजवी दर आकारले जात आहेत, त्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, काही विक्रेत्यांचे परवाने यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत.
एसटी महामंडळाने प्रवाशांना सवलती अधिक सुलभ आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड कार्यप्रणाली सुरू केली आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण सुरू आहे. लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासात एनसीएमसी कार्ड वापरणे अनिवार्य केले जाईल. त्यामुळे प्रवाशांची सोय होण्याबरोबरच सवलतींचा अचूक लाभ मिळेल. एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट वितरण, टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली असून, ती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
