
अंबाजोगाई प्रतिनिधी:-
महाड (जि. रायगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित (दिनांक 19 व 20 जानेवारी रोजी) दोन दिवसीय समतादूत राज्यस्तरीय कार्यशाळेत बीड जिल्ह्यातील बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी यांचा ‘उत्कृष्ट समतादूत’ म्हणून गौरव करण्यात आला. सामाजिक समता, संविधानिक मूल्यांचा प्रसार व जनजागृतीसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यशाळेत राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील समतादूतांचा सहभाग होता. या प्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सामाजिक न्याय, हक्क-जागर, तसेच समतादूतांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत व्यंकटेश जोशी यांनी केलेले कार्य राज्यपातळीवर कौतुकास पात्र ठरले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मुख्य सचिव श्री. हर्षदीप कांबळे, बार्टी चे महासंचालक श्री. सुनील वारे सर, निबंधक श्री. विशाल लोंढे सर, बीड जिल्हा सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग श्री. प्रदीप भोगले सर यांच्या मार्गदर्शनात बार्टी चे विभागप्रमुख डॉ.श्री. बबन जोगदंड सर, सुमेधजी थोरात यांनी हा पुरस्कार दिला.
या सन्मानामुळे बीड जिल्ह्यातील समतादूत प्रकल्पात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात समतादूत उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यंकटेश जोशी यांनी व्यक्त केली. या प्रसंगी बीड जिल्हा समतादूत प्रकल्प चे प्रकल्प अधिकारी श्री. योगेश सोनवणे सर व बीड जिल्ह्यात समतादूत नानाभाऊ गव्हाणे, सय्यद अखेब, संजय गुजर, पुरुषोत्तम स्वामी, ज्ञानेश्वर ढगे, भीमाशंकर कानधरे, महादेव तुरे, मधुसूदन मस्के, रवींद्र नांदे, वर्षा देशमुख यांनी व्यंकटेश जोशी यांचे अभिनंदन केले आहे.
