अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण ₹40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ येथील रहिवासी शैलेश पद्माकर स्वामी (वय 33) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 15 जुलै 2026 रोजी ते कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. 17 जुलै रोजी घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरातील कपाटाची पाहणी केली असता लहान मुलांचे सुमारे ₹14 हजार किमतीचे चांदीचे दागिने आणि ₹26 हजारांची रोख रक्कम असा एकूण ₹40 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समयुद्दीन जकीयोद्दीन शेख (वय 24, रा. बिलाल नगर, अंबाजोगाई) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले चांदीचे दागिने आणि ₹26 हजारांची रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान रियाज इक्बाल पठाण (रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार अमोल गायकवाड, भागवत नागरगोजे, पांडुरंग काळे तसेच पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत.
