वडवणी प्रतिनिधी :
तालुक्यातील चिंचवण येथे सोमवार (दि.२७) रोजी संध्याकाळी कौटुंबिक वादातून एक संतापजनक प्रकार घडला आहे. मुलाने दुचाकी दिलेल्या रागातून आई व भावाला मारहाण करणाऱ्या मुलाला रोखण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्ध वडिलांचीच पोटच्या मुलाने विटेने ठेचून हत्या केली.असून वडवणी पोलीस ठाण्यात जन्मदात्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच असल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीकिसन भागोजी कोठुळे (वय ७०, रा. चिंचवण, ता. वडवणी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. तक्रारदार शुभम कोठुळे याने उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी घरातील दुचाकी दिल्याच्या कारणावरून त्याचा भाऊ, आई व वडिलांमध्ये वाद सुरू झाला होता. आरोपी मुलगा फुलचंद श्रीकिसन कोठुळे याने “माझी मोटरसायकल शुभमला का दिली?” असे म्हणत पत्नी व लहान मुलगा बालाजी याला शिवीगाळ करत मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेला.
दरम्यान, अंगावर धावून येणाऱ्या मुलाला रोखण्यासाठी व भांडण सोडवण्यासाठी वृद्ध आजोबा श्रीकिसन कोठुळे मध्यस्थी करायला आले. त्यावेळी “तुम्ही सारखे आमच्या भांडणात का पडता?” असा राग धरून मुलगा फुलचंद याने आपल्या वृद्ध वडिलांना पत्र्याच्या शेडमधून बाहेर अंगणात ओढून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून अंगणात पडलेल्या विटेने त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले.घटनेनंतर नातेवाईकांनी जखमी श्रीकिसन यांना तातडीने चिंचवण येथील ग्रामीण रूग्णालयात व त्यानंतर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मृत वृद्धाचा नातू शुभम फुलचंद कोठुळे याच्या तक्रारीवरून फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
