
अंबाजोगाई / माजलगाव प्रतिनिधी :-
तालखेड फाटा–माजलगाव येथे झालेल्या सुमारे ६० लाख रुपयांच्या दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह ज्वेलर्स दुकानात कारागीर म्हणून काम करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १८ तोळे सोने व १ किलो चांदी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी माजलगाव येथील सोनार दुकानदार श्री. अमोल पंढरीनाथ गायके (वय ३१, रा. भाट वडगाव, ता. माजलगाव) हे आपल्या अमोल सोने-चांदी दुकानातून आठवडी बाजारात खेडा येथे दागिने विक्रीसाठी हिरो होंडा पॅशन मोटारसायकलवर जात असताना, पाठीमागून आलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलवरील तीन इसमांनी त्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत सोने-चांदीच्या दागिन्यांची पिशवी बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार बीड येथील शांताई हॉटेल परिसरातून एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले (वय ३५), कृष्णा तुकाराम निरडे (वय २२) व अभिषेक अशोक शिंदे (वय २२) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत एकनाथ कपाले हा सोनार कारागीर असून त्याला सोनार दुकानदारांच्या आठवडी बाजारातील हालचालींची माहिती असल्याचे निष्पन्न झाले. कर्जबाजारीपणामुळे त्याने दरोड्याचा कट रचून इतर साथीदारांना सामील करून हा गुन्हा केल्याचे उघड झाले. तपासात आणखी आरोपी निष्पन्न झाले असून एक आरोपी फरार आहे.
आरोपींकडून १८ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी असा सुमारे ३०, लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरील ही कामगिरी श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुशांत सुतळे, महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, मारुती कांबळे, भागवत शेलार, राहूल शिंदे, दिलीप गित्ते, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, मनोज परझने, अशफाक सय्यद, अर्जुन यादव, चालक पोह गणेश मराडे, नितीन वडमारे, अतुल हराळे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड व TAC सेलचे पोलीस उप निरीक्षक शेखर औटे व विकी सुरवसे यांनी केली आहे.
