
अंबाजोगाई प्रतिनिधी
केज तालुक्यातील लाडेगाव शिवारात पावन धाम परिसरात रात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात चार पाळीव शेळ्या व दोन बोकड ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटना शेख बापू आमीन साब (रा. लाडेगाव) यांच्या शेतात, सर्वे नंबर १३५ मध्ये घडली. रात्री अज्ञात हिंस्र प्राण्याने शेळ्या व बोकडांवर हल्ला करून त्यांना ठार केले. सकाळी ही बाब निदर्शनास येताच संबंधितांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागातील अधिकारी श्री. भालेराव, महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी सत्वधर व जोशी मॅडम यांनी घटनास्थळी येऊन मृत जनावरांची पाहणी केली.
या घटनेमुळे शेख बापू आमीन साब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
