
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी बुधवारी डिघोळआंबा येथे महिलांसाठी रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सामाजिक सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते अक्षय भुंबे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले. यात जवळपास १५० महिला आणि २०० पुरूष सहभागी झाले होते. यावेळी भुंबे परिवाराकडून २१ विधवा भगिनी आणि ५ दिव्यांगांना जीवनावश्यक १५ वस्तू, ड्रायफ्रूट, साखर व तेल या वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

डिघोळआंबा येथे बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी आयोजित रोजा इफ्तार कार्यक्रमात खजूर, फळे, ड्रायफ्रूट आदींसह रूचकर पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यावेळी आयोजक अक्षय भुंबे, व डिघोळआंबा गांवचे उपसरपंच बालाजी आबा मुळे, दीपक शिंदे, जीवन गायकवाड, अरूण बनसोडे, पोलीस पाटील पप्पू माके, आनंद कांबळे, अमोल खरात, सोमा वैरागे, रामराजे सावंत, मिलिंद खरात, बिभीषण गुंडरे, नवनाथ लेमटे, राहुल भुंबे, शेख रहीम नूर शेख आदींसह सर्वधर्मीय समाज बांधव, महिला भगिनी, युवक उपस्थित होते. रोजा इफ्तारच्या आयोजनाबाबत बोलताना अक्षय भुंबे यांनी सांगितले की, देशाला आज सर्वधर्मसमभाव, सामाजिक सलोख्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. मुस्लिम धर्मियांच्या या पवित्र महिन्यात, त्यांच्या सणात आपणही सहभागी होवून त्यांचा आनंद द्विगुणित केला पाहिजे. या विधायक हेतूने या भागातील मुस्लिम भगिनींसाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले आहे, ग्रामीण भागामध्ये सामाजिक सलोखा रूजला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू असे भुंबे यांनी सांगितले. रमजाननिमित्त डिघोळआंबा येथे महिलांसाठी भुंबे यांच्या पुढाकाराने अत्यंत चांगल्या प्रकारे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम महिला भगिनींनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
*ग्रामीण भागामध्ये सामाजिक सलोखा रूजला पाहिजे :*
आपल्या देशाचे संविधान ज्या चार प्रमुख तत्वांवर आधारित आहे. त्यातील एक म्हणजे समानता हे होय, आपल्याकडे अनेक रोजा इफ्तारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, यामध्ये महिलांचा सहभाग अत्यल्प असतो, त्यामुळे महिलांसाठी देखील हा उपक्रम राबवून एक दिवस त्यांना देखील इफ्तारची दावत देण्यात यावी या विधायक भावनेतून दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत समाजात ऐक्य व सौहार्द टिकविणे, तो वाढविणे, तसेच मुस्लिम महिला भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रोजा इफ्तार सारखे उपक्रम हे अत्यंत उपयुक्त ठरतात. ग्रामीण भागामध्ये सामाजिक सलोखा रूजला पाहिजे म्हणून मुस्लिमेत्तर बांधवांनी पुढाकार घेऊन असे उपक्रम राबविले पाहिजेत. बहुतेक वेळा मुस्लिम पुरूषांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. पण, महिलांसाठी मात्र तसे होत नाही. त्यामुळे महिलांना देखील अशा उपक्रमात सहभागी करून घेतले पाहिजे याच विधायक हेतूने आपण पुरूष व महिला दोन्हींसाठी पण रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
*- अक्षय भुंबे (सामाजिक कार्यकर्ते)*
