अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांसाठी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास आपत्कालीन व बाह्य रूग्ण विभाग असलेला वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला होता. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक केले. या कक्षाच्या माध्यमातून 350 पत्रकारांची तपासणी करण्यात आली.
अधिवेशना दरम्यान एखाद्या पत्रकाराला आरोग्याची काही समस्या निर्माण झाल्यास त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला होता अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे वैद्यकीय कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी दिली. या अभिनव उपक्रमाचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय एस.एम.देशमुख यांनी कौतुक करीत डॉ.राजेश इंगोले यांचे अभिनंदन केले. पत्रकारांच्या आरोग्यांप्रती संवेदनशील असणारा डॉक्टर या शब्दांत एस.एम.देशमुख यांनी डॉ.इंगोले यांचे कौतुक केले. यावेळी प्रत्यक्ष एस.एम.देशमुख यांनी या वैद्यकीय मदत कक्षाला भेट देऊन, पाहणी करत व यांश कक्षात स्वतःची आरोग्य तपासणी करून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. कारण, जीवनातील ताण-तणावामुळे व पत्रकार यांच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे पत्रकारांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सहजपणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक पत्रकारांवर आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अकाली डायबेटीस, रक्तदाब व इतर गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. नियमित तपासणी केल्यास या मोठ्या आजारांना वेळीच प्रतिबंध केला जाऊ शकतो. डॉ.राजेश इंगोले यांच्या माध्यमातून मराठी पत्रकार परिषदेला सक्षम असा वैद्यकीय कक्ष प्रमुख मिळाला आहे. आगामी काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाची स्थापना डॉ.राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करून पत्रकारांच्या आरोग्याला जपण्याचे काम मराठी पत्रकार परिषद करणार असल्याचे सुतोवाच मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी यावेळी केले. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये वैद्यकीय कक्षाची कार्यकारणी लवकरच डॉ.इंगोले हे जाहीर करणार आहेत अशी माहिती श्री.देशमुख यांनी यावेळी दिली. अधिक माहिती देताना वैद्यकीय कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांनी मुख्य विश्वस्त देशमुख सरांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात पत्रकारांसाठी वैद्यकीय कक्ष स्थापन केला जाणार आहे. तालुकास्तरीय कार्यकारणीच्या निवडी लवकरच घोषित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय कक्षाच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच आवश्यक असलेल्या रक्त तपासण्या ही मोफत करून देणार असल्याची माहिती डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, राज्यअध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, शिवराज काटकर, सुरेश नाईकवाडे, मन्सूर भाई शेख, रवी उबाळे, अनिल वाघमारे, शोभा जयपुरकर, दीपक केतके, संदीप कुलकर्णी यांच्यासह संयोजन समितीचे सचिन शिवशेट्टी, युवराज धोत्रे, विभीषण, अर्जुन जाधव, सिद्धार्थ सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.राजेश इंगोले यांचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय अंबेकर, पुनमचंद परदेशी, अशोक दळवे, आरेफ सिद्दीक्की, नय्युम शेख, मुशीर बाबा, प्रशांत मस्के, शेख फेरोज, संजय रानभरे, विरेंद्र गुप्ता, एम.एम.कुलकर्णी, एस.व्ही.जोशी, वैद्यकीय कर्मचारी मनोज इंगोले, समता मनोहर, तुषार मनोहर यांनी परिश्रम घेतले. यावेळी तब्बल 350 पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार डॉ.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
