
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एकीकडे वर्षानुवर्ष मागणी होत असलेल्या घाटनांदुर श्रीगोंदा या रेल्वे मार्गाच्या मागणी साठी बीड व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पूर्णपणे उदासीन असताना रेल्वे बोर्डाचे सदस्य व अंबाजोगाईचे भूमीपुत्र डॉक्टर आदित्य पतक राव हे मात्र या मार्गासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
नुकतीच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झालेल्या १२७ व्या विभागीय झोनल रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डॉ. आदित्य पतकराव यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या ‘घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदा-जामखेड-श्रीगोंदा’ या नवीन रेल्वे मार्गाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अकोल्याचे खासदार ना. अनुप धोत्रे, रेल्वेचे सचिव श्री मिश्रा यांच्या सह रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झोनल रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत डॉ आदित्य पतकराव यांनी अनेक दशकांपासूनची घाटनांदुर श्रीगोंदा रेल्वे मार्गाची मागणी आता कागदावरून रुळावर आणा अशी मागणी करत या प्रकल्पाचा ऐतिहासिक धागा पकडून प्रशासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “२०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली होती आणि २०१६ मध्ये प्राथमिक सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र, गेली १० वर्षे हा प्रकल्प केवळ तांत्रिक कारणांमुळे लाल फितीत अडकला आहे. आता वेळ आली आहे की हा प्रकल्प कागदावरून प्रत्यक्षात जमिनीवर उतरवण्याची.” व त्या साठी केंद्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी जो २३,९२६ कोटी एवढा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे यातील ३,५०० ते ४,००० कोटी रुपयाचा निधी या प्रकल्पासाठी वळवून, कामाची सुरुवात तातडीने करावी, अशी लेखी मागणी डॉ. पतकराव यांनी महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
डॉ. आदित्य पतकराव यांनी या मार्गाची गरज स्पष्ट करताना तीन प्रमुख मुद्दे प्रामुख्याने मांडले असून या मध्ये अंबाजोगाई आणि केज सारखी मोठी शहरे रेल्वेविना मागास राहिली आसल्याने हा मार्ग या भागाचा कायापालट करणारा ठरेल.
या पट्ट्यातील शेतीमाल आणि स्थानिक व्यापाराला थेट मुंबई-पुण्यासारख्या महानगरांची बाजारपेठ उपलब्ध होईल.
आणि अंबाजोगाईचे योगेश्वरी देवी शक्तिपीठ आणि परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग ‘जीवनवाहिनी’ ठरेल
या बैठकीत डॉ. पतकराव यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेत, रेल्वे प्रशासनाकडून या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
