*इमर्जन्सी आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार ~ राज्य पदाधिकारी डॉ.राजेश इंगोले यांची माहिती*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. आयएमए महाराष्ट्र शाखेने येत्या सोमवार, दिनांक २० जुलै सकाळी ६ ते मंगळवार २१ जुलै सकाळी ६ पर्यंत २४ तास सर्व नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात सर्व ओपीडी बाह्यरूग्ण विभाग, नियोजित शस्त्रक्रिया आणि रूटीन तपासणी बंद राहील. मात्र गंभीर रूग्णांच्या जीवाशी धोका होऊ नये म्हणून आय.सी.यु, आपत्कालीन विभाग, प्रसूती कक्ष आणि जीवनावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनात अलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, डेंटल, यूनाणीसह सर्व वैद्यकीय शाखांचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ आणि आरोग्य संघटना एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र राज्य आयएमएने खालील प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. त्या अशा : १) डोंबिवली हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक आणि कठोर शिक्षा, २) डॉक्टर्स प्रोटेक्शन कायद्यात कडक तरतुदी आणि जलद अंमलबजावणी, ३) सर्व सरकारी आणि खाजगी रूग्णालयांमध्ये २५ ×७ सुरक्षा, सीसीटीव्ही प्रवेश नियंत्रण, ४) हल्ल्याच्या केसेससाठी फास्टट्रॅक कोर्ट, ५) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा आयएमए ने सरकारला इशारा दिला आहे की, ९ ऑगस्ट २०२६ पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर बेमुदत संप आणि संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद आंदोलन छेडण्यात येईल. जगातला कोणताही वैद्यकीय व्यावसायिक सर्वप्रथम रूग्णहिताला प्राधान्य देतो आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाचे प्राण कसे वाचतील याकरिता तो आपले सर्व कौशल्य पणाला लावून त्या रुग्णाचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. परंतु, ही सेवा देत असताना जर त्याच्या स्वतःच्याच जीविताला धोका असेल आणि अशा भयावह दडपणाच्या वातावरणात तो रुग्णाचा इलाज चांगल्या पद्धतीने करू शकेल का हा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी सरकारला केला आहे. हा संपाचा निर्णय रूग्णांविरोधी नाही. डॉक्टर सुरक्षित राहतील तरच रुग्णसेवा सुरक्षित राहील असे डॉ.राजेश इंगोले यांनी स्पष्ट केले आहे. डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आयएमए ने २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै सकाळी ६ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. फक्त इमर्जन्सी, अतिदक्षता विभाग आणि प्रसूती सेवा सुरू राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या अधिनिस्त सर्व शाखांना दिली आहे. या संपामुळे रूग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन दिलगीर आहे. परंतु, डॉक्टरांना काम करण्यासाठी मुक्त वातावरण मिळत नसल्याने तसेच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून डॉक्टरांना, नर्सेसला, पॅरामेडिकल स्टाफला मारहाण होणे चुकीचे व गंभीर आहे त्यामुळे नाईलाजाने हा संप आम्हाला करावा लागत आहे असेही डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले. या लाक्षणिक एक दिवसीय संपानंतरही जर सरकारने ९ ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला जाईल आणी सर्व खासगी तसेच सरकारी वैद्यकीय सेवा संप काळात बंद केल्या जातील त्यानंतर सर्व जबाबदारी सरकारवर राहील असा गंभीर इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे देण्यात आला आहे असे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
