अंबाजोगाई प्रतिनिधी :– अंबाजोगाई शहरात व अंबाजोगाई तालुक्यातील मंगाईवाडी गुरुवारी दोन हृदयद्रावक घटना उघडकीस आल्या असून यात दोन अल्पवयीन मुलींनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आईने किरकोळ कारणावरून रागावल्याचा राग मनात धरून या मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पहिली घटना अंबाजोगाई शहरातील माळी नगर भागात घडली. येथील रिद्धी अशोक चाटे या १४ वर्षीय मुलीला तिची आई कोणत्यातरी कारणावरून रागावली होती. याचा राग तिने मनात ठेवला. गुरुवारी आई बाहेरगावी गेलेली असताना रिद्धीने आपल्या वडिलांना आईस्क्रीम आणण्यासाठी बाजारात पाठवले. वडील घराबाहेर जाताच तिने राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतला. वडिलांनी घरी परतल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून जमादार बाबासाहेब आचार्य तपास करत आहेत.
दुसरी घटना अंबाजोगाई तालुक्यातील मंगाईवाडी येथे घडली. येथे मयुरी माणिक गडदे या १५ वर्षीय मुलीने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घरात जनावरांच्या कामावरून आई रागावल्याचा राग आल्याने मयुरीने शौचास जाते असे सांगून घर सोडले आणि थेट शेतात जाऊन नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. मयुरीला चार बहिणी असून या घटनेमुळे गडदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महेश भागवत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या अत्यंत दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी तरुण पिढीला आवाहन केले आहे. क्षुल्लक कारणावरून राग अनावर करून घेऊ नये, मानवी जीवन हे अत्यंत अमूल्य असून टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाचा विचार करावा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
