अंबाजोगाई अशोक दळवे :–
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ₹7 लाख 90 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे दिनांक 03 जून 2026 रोजी परळी वेस परिसरात पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. यावेळी MH-44-B-2529 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पान मसाला, विडी-1 तंबाखू, प्रीमियम गोवा 1000 मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम ZL-01 जाफरानी जर्दा पान मसाला, डॉक्टर स्पेशल पान मसाला तसेच प्रीमियम शॉर्ट लक्झरी सेव्हन टोबॅको पान मसाला यांचा समावेश आहे.
पोलीसांनी प्रतिबंधित मालाची किंमत ₹3,40,020 तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत ₹4,50,000 असल्याचे सांगितले. अशा प्रकारे एकूण ₹7,90,020 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शशिकांत शिवाजी बुलबुले (वय 25 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, मोरेवाडी, अंबाजोगाई) याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत सर, प्रभारी पोलीस अधीक्षक सौ. चेतना मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे तसेच अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस अंमलदार राठोड तसेच पोलीस शिपाई हनुमंत चादर आणि सुशांत गायकवाड यांनी सहभाग घेतला.
प्रतिबंधित गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील ही कारवाई अंबाजोगाई शहर पोलिसांसाठी मोठे यश मानली जात आहे.
