११० लिटर सिंधी दारूसह दुचाकी जप्त; दोघे ताब्यात
अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील हत्तीखाणा परिसरात अवैधरित्या सिंधी दारूची विक्री करणाऱ्यांवर अंबाजोगाई पोलिसांनी शुक्रवारी (दि. ५ जून) धडक कारवाई करत ११० लिटर सिंधी दारूसह दुचाकी जप्त केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हत्तीखाणा परिसरात अवैध सिंधी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. यावेळी महबूब चंदू बेनिवाले (वय ४७, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) आणि अफरोज शफिक बागवान (वय ३८, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ११० लिटर सिंधी दारू किंमत अंदाजे १० हजार ४०० रुपये तसेच ८५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेला एकूण मुद्देमाल सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा असल्याचे सांगितले.
अंबाजोगाई पोलिसांनी शहर व परिसरात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून दारू, मटका, गुटखा आणि जुगार अड्ड्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. अवैध सिंधी दारूची विक्री करणाऱ्यांवरही आता विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भागवत कांदे, पोलीस हवालदार भागवत नागरगोजे, पोलीस अंमलदार रवीकुमार केंद्रे, बाळासाहेब पारवे व त्यांच्या पथकाने केली.
अवैध धंद्यांविरोधातील या कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
