१२ दिवसांचा संसार अन् दुर्दैवी शेवट; तलाठी गणेश कोळी आत्महत्या प्रकरणी पत्नीविरुद्ध गुन्हा
अंबाजोगाई प्रतिनिधी : लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत तलाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात नवविवाहित पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्तू कोळी (वय २६) यांनी अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात आत्महत्या केली होती.
या प्रकरणी मृत गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, गणेश हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेत यश मिळवत २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे २०२६ रोजी त्याचा विवाह दीपाली धनंजय कोळी हिच्याशी झाला होता.
तक्रारीत म्हटले आहे की, विवाहानंतर दीपालीच्या वागण्यात बदल जाणवत होता. २४ मे रोजी गणेश अंबाजोगाई येथे पत्नीला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीशी दूरध्वनीवर संवाद साधताना मानसिक तणावात असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर मोरेवाडी येथील राहत्या ठिकाणी त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.
मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीत पत्नीच्या वर्तनामुळे आणि मानसिक त्रासामुळे गणेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक वशिष्ठ कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
