अंबाजोगाई, प्रतिनिधी :
अंबाजोगाई ते आपेगाव या महत्त्वाच्या जिल्हा परिषद रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अवघ्या ७ ते ८ किलोमीटरच्या अंतरात तब्बल १५०० हून अधिक खड्डे पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आता ही अवस्था आहे तर भर पावसाळ्यात काय अवस्था होईल खड्ड्यांच्या विळख्यात अंबाजोगाई–आपेगाव रस्ता; ७ ते ८ किलोमीटरमध्ये तब्बल १५०० खड्डे, नागरिकांचा संताप
शाळकरी विद्यार्थी बससेवा बंद करण्यात आली आहे, वाहनधारक व प्रवाशांचा जीव धोक्यात; हिवरा खुर्द, सोमनाथ बोरगाव, धानोरा, माकेगाव, कानडी बदन आपेगाव यांसह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग पुढे लातूर महामार्गाला जोडतो. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, कामगार, नोकरी करणारे नागरिक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी व अनेक वाहनधारकांचा प्रवास सुरू असतो. मात्र रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की काही भागात विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या अडचणीमुळे महामंडळाच्या बससेवा बंद करण्यात आली आहे महामंडळानी सुद्धा ऐनवेळी पाठफिरवली अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात याच मार्गावरील विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाचे अधिकारी या रस्त्याच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
“या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येकवेळी जीव मुठीत धरावा लागतो. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा सर्व गावकरी व वाहनधारकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
