धारूर प्रतिनिधी:-
धारूर–तेलगाव मार्गावरील चोरांबा शिवारात शनिवारी (दि. ४) सकाळी माजलगाव–अंबाजोगाई या ई-बसचा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथून अंबाजोगाईकडे निघालेली ई-बस चोरांबा शिवारात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना मदत केली.
या अपघातात बसचेही नुकसान झाले असून जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, धारूर–तेलगाव मार्ग अरुंद असल्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
