नोटीसच्या रागातून हल्ल्याचा आरोप; लाकडी दांडक्याने मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी शिवारात शेतातील वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ जगदीश जाजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतासंदर्भातील प्रकरणात दिलेल्या नोटीसचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. तसेच, “शेतात पाऊल ठेवल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यावेळी एका आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून दुखापत केली. त्यानंतर इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सुनील प्रतापराव लोमटे, तिनित प्रतापराव लोमटे, प्रज्ज्वल सुनील लोमटे आणि महफेज उस्तमराव लोमटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पुढील कारवाई सुरू आहे.
