अंबाजोगाई | प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्पा सेंटरविरोधात पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६ जून) मोठी कारवाई करत तीन स्पा सेंटर सील केले. शहरातील पोखरी रोडवरील दोन आणि तथागत चौक परिसरातील एका स्पा सेंटरवर अचानक छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धडक मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही स्पा सेंटरमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून बेकायदेशीर स्वरूपाचे प्रकार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने नियोजनबद्ध कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक फड, पोलीस अंमलदार खरटमल, खेलबुडे, खंदारे तसेच महिला पोलीस अंमलदार किर्दंत आणि भुसारी यांचा समावेश होता. पथकाने तिन्ही ठिकाणी अचानक छापे टाकून तपासणी केली असता, संबंधित चालकांकडे स्पा सेंटर चालवण्यासाठी आवश्यक असलेले वैध परवाने व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर पोलिसांनी तिन्ही स्पा सेंटर तात्काळ सील करून त्यांचा व्यवसाय बंद केला. संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत शहरातील बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसायांना मोठा धक्का बसला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
