अंबाजोगाई प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनतर्फे शहरातील सर्व कोचिंग क्लास चालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक दि. २९ जून २०२६ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे पार पडली.
ही बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या सूचनेनुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चेतना मॅडम आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, शासनाच्या नियमांचे पालन आणि कोचिंग क्लासमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध महत्त्वाच्या सूचनांची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत क्लास चालकांना सर्व आवश्यक शासकीय परवाने वैध ठेवणे, इमारतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र उपलब्ध ठेवणे, अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे, वर्गखोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) कायम अडथळामुक्त ठेवणे, स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून किमान एक महिन्याचे रेकॉर्डिंग जतन करणे, विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी करणे आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करणे, संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे, विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवणे, प्रथमोपचार पेटी व आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध ठेवणे तसेच छेडछाड, रॅगिंग, सायबर गुन्हे किंवा सोशल मीडियावरील त्रासाच्या घटना त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहनही केले
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून सर्व कोचिंग क्लास चालकांनी शासनाच्या नियमांचे व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनतर्फे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यातही अशा जनजागृतीपर व प्रतिबंधात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
