अंबाजोगाई | प्रतिनिधी
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी उल्लेखनीय कामगिरी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याने केली आहे. हरवलेले एकूण १५ मोबाईल फोन तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वयाच्या माध्यमातून शोधून काढत संबंधित मूळ मालकांना परत सुपूर्द करण्यात आले.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात विविध नागरिकांनी त्यांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईलचे लोकेशन, आयएमईआय क्रमांक आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे सातत्याने शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर १५ मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले.
आज संबंधित मोबाईलधारकांना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बोलावून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. चेतना तिडके तसेच मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्री. रविकुमार केंद्रे यांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध स्तरांवरील समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळाले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. मोबाईल हरवल्यास वेळ न दवडता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईलमध्ये स्क्रीन लॉक, मजबूत पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकसारख्या सुरक्षा सुविधा वापरून वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ती मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी अंबाजोगाई शहर पोलिसांचे तसेच या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अंबाजोगाई शहर पोलीस नागरिकाभिमुख कामकाजाचे उत्तम उदाहरण ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
