अंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील बस डेपो परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या एटीएममध्ये फोडाफोड करून रोकड चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले महिंद्रा मॅक्स वाहन जप्त करण्यात आले आहे. या जलद कारवाईबद्दल अंबाजोगाई शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.१३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपींनी बस डेपोजवळील एसबीआय एटीएमचे लॉक व बाहेरील भाग फोडून मशीनमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनाचा सायरन ऐकू आल्याने आरोपींनी चोरीचा प्रयत्न अर्धवट सोडून घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७५/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ६२, ३२४ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण केले. तपासादरम्यान संशयित वाहन परळीच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परळी शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून वाहनावरील सांकेतिक चिन्हांच्या आधारे वाहन व संशयितांची ओळख पटविण्यात आली.
यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाणे व परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेशी (एलसीबी) समन्वय साधला. एलसीबी परभणीच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यानंतर त्यांना अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
परमेश्वर सोनाभाऊ बनगर (रा. झरी, ता. मानवत, जि. परभणी)
राजेश भाऊसाहेब कांबळे (रा. कोल्हा, ता. मानवत, जि. परभणी)
विवेक बबन धारे (रा. कोल्हा, ता. मानवत, जि. परभणी)
या गुन्ह्यात वापरण्यात आलेले महिंद्रा मॅक्स वाहन पोलिसांनी जप्त केले असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे, प्रकाश गायकवाड, अनिल डोंगरे, संदीप मुंडे, बदाम आरसूळ, हनुमंत चादर, हनुमंत लाड तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब घुगे यांच्या पथकाने पार पाडली.
