अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून सोन्याचे गलसर चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला.
दि. 15 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.15 वाजता अंबाजोगाई बसस्थानक येथे ही चोरीची घटना घडली. फिर्यादी जरीन ईस्माईल मुजावर (वय 24 वर्षे, रा. गाडिपुरा, धाराशिव) या आपल्या पतीसोबत धाराशिव येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पर्समधून काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले अंदाजे 8.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर, किंमत सुमारे 56 हजार रुपये, चोरून नेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सीआर क्र. 309/2026, कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. कौशल्यपूर्ण तपासातून लातूर येथील एका महिला आरोपीकडून निष्पन्न करण्यात आला. पोलिसांनी संबंधित महिला महेक शेख रा लातूर आरोपीस ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले 8.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गलसर हस्तगत केले. त्यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.
या कारवाईमुळे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला चोरीचा गुन्हा घटनेपासून एका महिन्याच्या आत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक तेजस वावळे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सौ. चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे, पोलीस नाईक तेजस वावळे तसेच पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांनी सहभाग घेतला.
अंबाजोगाई बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू व दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
