₹१.५४ लाखांचे २२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी केली हस्तगत
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शहरातील जिजाऊ चौक पाटीजवळ, मोरेवाडी परिसरात महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून नेल्याच्या गुन्ह्याचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीस गेलेले २२ ग्रॅम वजनाचे, तब्बल ₹१ लाख ५४ हजार किमतीचे मिनी गंठण हस्तगत करण्यात आले आहे.
दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी आशा भारतराव चौधरी या जिजाऊ चौक पाटीजवळ, मोरेवाडी परिसरातून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण खेचून चोरून नेले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३५१/२०२६, कलम ३०४, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून सलग दोन दिवस माहिती संकलित केली. या तपासातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी धनाजी देविदास शिंदे (वय २६ वर्षे, रा. गंभीरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यास कळंब येथून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले.
आरोपीकडून २२ ग्रॅम वजनाचे ₹१,५४,००० किमतीचे मिनी गंठण तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना मॅडम आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पोलीस हवालदार पांडुरंग काळे आणि पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले करीत आहेत.
