माजलगाव प्रतिनिधी :–
माजलगाव तालुक्यातील तेलगाव रोडवर एसटी बस आणि हुंडाई कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. हॉटेल शिवराजजवळ घडलेल्या या भीषण अपघातामुळे माजलगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
समोरासमोर धडक; कारचा पुढील भाग चक्काचूर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाथरूड परिसरात, तेलगाव–माजलगाव मार्गावर एसटी बस क्रमांक MH-20-2740 आणि हुंडाई कार क्रमांक MH-26 AK-4210 यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. धडकेनंतर कार एसटी बसच्या खाली घुसल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली.
या भीषण दुर्घटनेत कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्ती माजलगाव शहर व तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांच्या नावांची आणि ओळखीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास सुरू आहे.
मृतांची ओळख आणि अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातातील मृतांची अधिकृत नावे, अपघाताचे नेमके कारण आणि अन्य तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. पोलिसांच्या पुढील तपासातून या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
एकाच अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची ओळख पटविण्यासह अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
