परळी प्रतीनिधी :–येथील महिला महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्यास त्याच्या राहत्या घरातून गाडीवर बसवून घेऊन जाऊन अमानुष मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवार (दि.९)रोजी घडली होती. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीनुसार,अनिल बाबुराव पत्की हे परळी येथील महिला महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी वैजनाथ यादव रा. परळी याच्यासोबत त्यांचे मागील काही वर्षांपासून पैशांचे व्यवहार होते. दि.९ जून रोजी सकाळी १० वाजता आरोपी वैजनाथ यादव फिर्यादीच्या घरी आला. व्यवहाराच्या बहाण्याने त्याने फिर्यादीला आपल्या दुचाकीवर बसवून काळ रात्री मंदिर आणि धारावती परिसरात नेले.नदीच्या पलीकडे एका निर्जन झाडीमध्ये त्याने गाडी थांबवली. त्या ठिकाणी आरोपीचे दोन अनोळखी साथीदार मोटारसायकलसह आले. तेथे आरोपी वैजनाथ यादव याने फिर्यादीला पैसे दे नाहीतर तुझा जीव घेईन’अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी बाजूला पडलेल्या लाकडी काठीने आणि बेल्टने फिर्यादीला पाठीवर, डोक्यावर व पायावर बेदम मारहाण केली.”जर आरडाओरडा केला किंवा पोलिसांत तक्रार केली, तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला दुपारपर्यंत तेथेच डांबून ठेवले. दुपारनंतर फिर्यादीला सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या अनिल पत्की यांनी नातेवाईकाना सांगितले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन. बुधवार (दि.१०) रोजी परळी शहर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.
आठ तास डांबून ठेवत बेल्ट-काठीने बेदम मारहाण…
आर्थिक व्यवहारातून निर्जनस्थळी नेत तिघांकडून आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आली.या व्यवहारापोटी पत्की यांनी यादव यांना १ लाख रुपये परत केले असे असतानाही यादव यांनी आणखी चार लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा दरम्यान केलेल्या मारहाणी नंतर लिपिकाला आरोपीच्या दुकानासमोर सोडून देण्यात आले. ही मारहाण इतकी अमानुष आहे की त्यांच्या पाठीवरची चामडी सोलून निघाली असुन शरीरावर सर्वत्र व्रण उमटले आहेत. अतिशय निर्दयीपणे ही मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
