*जय जवान आजी माजी सैनिक संस्थेची निवेदनाद्वारे मागणी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील बीड शहराच्या कालिकानगर परिसरातील रहिवासी माजी सैनिक जालिंदर सदाशिव सानप यांच्यावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला आहे. हि घटना अत्यंत गंभीर व निंदनीय आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा या प्रकरणी सखोल चौकशी व दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, संस्था पदाधिकारी आणि सभासद यांनी उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील कालिकानगर परिसरात राहणारे जालिंदर सानप हे ९ मार्च रोजी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या चहाच्या गाड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तेव्हा गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यावरून त्यांचा चहाविक्रेत्याशी वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपींनी सानप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तसेच त्यांच्या अंगावर उकळता चहा फेकला. या हल्ल्यात ते गंभीर भाजले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कारवाईस विलंब केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत सदरील घटनेच्या निषेधार्थ जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई यांना मंगळवार, दिनांक २४ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील बीड शहराच्या कालिकानगर परिसरातील (गल्ली क्र.१८), बालेपीर येथील रहिवासी माजी सैनिक जालिंदर सदाशिव सानप यांच्यावर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला आहे. हि घटना अत्यंत गंभीर व निंदनीय आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील माजी सैनिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केलेल्या एका माजी सैनिकावर अशा प्रकारचा हल्ले होणे हि अत्यंत दुर्दैवी, निषेधार्य बाब आहे. अशा प्रकारांमुळे माजी सैनिकांवर होणारे अन्याय, अत्याचार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरणाची सखोल व नि:ष्पक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच योग्य त्या कलमांचा वापर करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी. माजी सैनिकांना न्याय मिळावा. भविष्यात अशा घटना घडू नयेत. यासाठी आपण योग्य ती पावले उचलावित अशी अपेक्षा व्यक्त करून या संदर्भात योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिकांची मदत घेवूत. असे सदरील निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देण्यासाठी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे पदाधिकारी सैनिक कॉलनी पासून माता रमाई आंबेडकर चौक, भारतरत्न राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे दुचाकीवर निषेध फेरी काढून उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई येथे पोहचले. यावेळी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, संस्था पदाधिकारी आणि सभासद यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत सदरील विषयावर सखोल चर्चा केली. या चर्चेनंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी निवेदकांना दिले. सदरील निवेदनाच्या प्रति माहितीस्तव जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, बीड यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप, कॅप्टन शेख उस्मान, सुभेदार आबासाहेब हाके, नायक बाबासाहेब केंद्रे, नायक अरविंद तपसे, नायक अंकुश काळे, बी.एच.एम. राधाकिशन कुंडगर, नायक महेश्वर सोळुंके, नायक यशवंत व्हावळे, नायक शंकर थोरात, सुभेदार संभाजी वाघमारे, नायक शिवाजी गंगणे, हवालदार सर्जेराव शिरसठ, नायक युवराज भुंबे, नायक महारूद्र गौरशेटे, नायक प्रकाश शिंदे यांच्यासह शेकडो माजी सैनिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
