*आरोपींना आश्रय देणाऱ्यांवर कारवाईसाठी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या*
अंबाजोगाई- प्रतिनिधी :–
अंबाजोगाईतालुक्यातील घाटनांदूर येथे एका तरुणाची चाकू भोसकून आणि डोक्यात वीट मारून निर्घृण हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, आरोपींना आश्रय देणाऱ्या मंगल कार्यालय मालक आणि व्यवस्थापकावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या दिला. ज्ञानेश्वर वाकडे हा लातूर येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. तो कामानिमित्त ११ जुलै रोजी आपल्या गावी पट्टीवडगाव येथे आला होता. रात्री साडेसहाच्या सुमारास तो मित्र विवेक तारसे याच्यासोबत पैसे काढण्यासाठी बाहेर पडला. अंबाजोगाईहून काम आटोपून परतत असताना शेपवाडी आणि धायगुडा पिंपळादरम्यान त्यांचा सामना कन्नैय्या ऊर्फ श्रीहरी मिसाळ, विशाल शिंदे आणि सोमनाथ कांबळे यांच्याशी झाला. तिथे सोशल मीडियाच्या कारणावरून सोमनाथ आणि ज्ञानेश्वरचा मित्र प्रथमेश जोगदंड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ‘मला हलक्यात घेऊ नका’ अशी धमकी देऊन ते तिघे निघून गेले.
यानंतर रात्री उशिरा सोमनाथ कांबळे याने प्रथमेशला फोन करून तडजोड करण्यासाठी घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ बोलावले. मात्र, तिथे पोहोचताच आरोपींनी प्रथमेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सात ते आठ जणांच्या जमावाने या तरुणांवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर अण्णाभाऊ साठे चौकाच्या दिशेने पळाला. मात्र, पाठलाग करून सोमनाथ कांबळे याने ज्ञानेश्वरच्या पोटात चाकू खुपसला. तो खाली पडताच विशाल शिंदे याने त्याच्या डोक्यात वीट मारली, तर गोकुळ इचके याने पाठीवर काठीने वार केले. सुरज ताटे, समाधान मिसाळ, कन्नैय्या मिसाळ आणि गणेश खंदारे यांनीही ज्ञानेश्वरला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला, तर त्याचे मित्र प्रथमेश आणि विवेक हे गंभीर जखमी झाले
या प्रकरणी ज्ञानेश्वरचे वडील उत्तरेश्वर वाकडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमनाथ केरबा कांबळे (साळुंकवाडी), विशाल शिंदे, गोकुळ इचके, सुरज ताटे, समाधान मिसाळ, कन्हैया सोपान मिसाळ आणि गणेश खंदारे या सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत घाटनांदूर येथून पाच आरोपींना अटक केली. यातील एका आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भिंतीवरून उडी मारताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या आणि तणाव
ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपी लपून बसले होते. त्यांना ‘आई मंगल कार्यालया’चे मालक तथा घाटनांदुरचे सरपंच महेश गारठे आणि व्यवस्थापक बालाजी मिसाळ यांनी आश्रय दिला असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी आरोपींना याच मंगल कार्यालयातून ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपींना आश्रय देणाऱ्या गारठे आणि मिसाळ यांचाही या कटात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, त्यांना या गुन्ह्यात मुख्य आरोपी करावे, या मागणीसाठी ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी आणि पट्टीवडगावच्या ग्रामस्थांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. घरातील तरुण मुलगा गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. संतप्त जमावामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना आणि संताप यावेळी स्पष्ट दिसत होता. ॲड. माधव जाधव यांनी आक्रमकपणे आंदोलकांची बाजू मांडली.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचा सुसंवाद
ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी संतप्त आंदोलकांशी थेट संवाद साधला. नातेवाईकांच्या भावना आणि आक्रोश समजून घेत त्यांना शांत करण्याचे काम त्यांनी केले. कायदेशीर प्रक्रियेची योग्य माहिती देऊन आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन देऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ दिली नाही.
