अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहरातील तथागत चौक परिसरात सोमवारी सकाळी आढळून आलेल्या विवेक करपे (वय ४१) यांच्या मृत्यूबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचा मृत्यू लिव्हर सिरोसिस या आजारामुळे झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली आहे.
सोमवारी सकाळी तथागत चौकात एका व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ अंबाजोगाई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला होता.
मृत विवेक करपे हे मूळचे केज तालुक्यातील जवळबन गावचे रहिवासी असून, सध्या ते पत्नी व मुलांसह केज येथे वास्तव्यास होते. ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात त्यांच्या खिशात प्रवासाचे तिकीटही आढळून आले होते. त्यामुळे ते केज किंवा अन्य ठिकाणाहून अंबाजोगाई येथे आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुरुवातीला मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
मात्र, शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणीनंतर विवेक करपे यांचा मृत्यू लिव्हर सिरोसिसमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात घातपात किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे कारण नसल्याचे समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये.
