बीड | प्रतिनिधी
शहरातील खंडेश्वरी परिसरातील साईनगर येथे एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (दि. ८) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैभव दीपक बुरांडे (वय २९, रा. साईनगर, आकाशवाणी पेठ, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव हा मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी सकाळी त्याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे. वैभव हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने परिसरात त्याची ओळख होती. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे.
