जनतेची कामे रखडल्याचा आरोप; लोकविकास महाआघाडीचा प्रशासनाविरोधात एल्गार
अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाई नगरपरिषदेत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या कथित अनियमित उपस्थितीविरोधात आज लोकविकास महाआघाडीच्या नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे शहरातील विकासकामे, प्रशासकीय प्रक्रिया आणि नागरिकांची विविध कामे रखडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.लोकविकास महाआघाडीचे
उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, गट नेते ताहेर भाई, विकास काकडे (नियोजन आणि विकास समिती), भीमसेन अप्पा लोमटे, बांधकाम सभापती नगरसेवक नजीर पठाण, नगरसेवक महेश लोमटे, नगरसेवक महेश कदम ,नगरसेवक राजपाल जावळे स्थायी समिती सदस्य, नगरसेवक आकाश कराड ,रौफ भाई, अकबर भाई पठाण, सचिन जाधव, शेख अश्फाक भाई यांच्यासह इतर नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन हे आंदोलन केले.जनतेच्या समस्या आणि प्रभागातील विविध प्रश्न घेऊन वारंवार कार्यालयात जावे लागते; मात्र मुख्याधिकारी अनेकदा अनुपस्थित असल्याने फाईली प्रलंबित राहत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांबाबतचे निर्णय व मंजुरी रखडल्याने प्रशासनाचा कारभार विस्कळीत झाला असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाही अधिकाऱ्यांची भेट मिळत नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचे त्यांनी सांगितले.या निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. “मुख्याधिकारी नियमितपणे कार्यालयात हजर राहून जनतेची कामे मार्गी लावत नाहीत तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा लोकविकास महाआघाडीच्या नगरसेवकांनी दिला.या आंदोलनामुळे नगरपरिषदेतील प्रशासकीय कारभार आणि मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
