अंबाजोगाई शहर पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी; सोन्याची चैन चोरीचा गुन्हा उघड, आरोपी अटक
अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोन्याची चैन चोरीचा गुन्हा अवघ्या 15 दिवसांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली सुमारे ₹1 लाख किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वैजनाथ येथील भीमनगर परिसरातील रहिवासी सुमनबाई मधुकर कांबळे (वय 65) यांनी दि. 1 जून 2026 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्या शिवाजी चौक ते पंचायत समिती मार्गे घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून भुरळ घातली आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे ₹1 लाख किंमतीची सोन्याची चैन फसवणुकीने चोरून नेली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने करण्यात आला. तपासादरम्यान दि. 14 जून 2026 रोजी दिलीप विश्वनाथ स्वामी (वय 47, रा. महादेव गल्ली, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर) यास आरोपी म्हणून निष्पन्न करून अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरीस गेलेली ₹1 लाख किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक तेजस वावळे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याचा छडा लावण्यात अंबाजोगाई शहर पोलिसांना यश मिळाले असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे अंबाजोगाई पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे, भागवत नागरगोजे, अमोल गायकवाड तसेच पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड व हनुमंत चादर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
