अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई शहरातील चनई येथील वडारवस्ती परिसरात किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) (खून) ची वाढ करण्यात आली असून, चार जणांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चनई वडारवस्ती, किरमाणी दर्ग्याच्या पाठीमागे राहणाऱ्या राणी बालाजी राठोड (वय 31) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 जुलै 2026 रोजी दुपारी त्या शेळ्या चारण्यासाठी खदाणीजवळ गेल्या असताना परिसरातील महिलांमध्ये सुरू असलेल्या वादानंतर सुभाष लष्करे यांनी त्यांच्या अंगावर धाव घेत त्यांना ढकलून चापट मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी वाद सोडविण्यास आलेल्या त्यांच्या नातेवाईकालाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी, 11 जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राणी राठोड यांच्या आई यशोदा बालाजी राठोड यांनी सुभाष लष्करे यांना मुलीला विनाकारण मारहाण का केली, असा जाब विचारला. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. फिर्यादीनुसार, यावेळी सुभाष लष्करे, त्यांची पत्नी मंदाकिनी, तसेच मुलगे विश्व आणि ईद्र यांनी शिवीगाळ व मारहाण केली.
वाद सुरू असताना सुभाष लष्करे यांनी प्रथम एक विट फेकून फिर्यादीच्या मामाला मारल्याचा, त्यानंतर दुसरी विट यशोदा राठोड यांच्या डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने फेकल्याचा आरोप आहे. विट डोक्यात लागल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर भांडण सोडविण्यास आलेल्या रोहन माणिक आडे यांनाही काठीने मारहाण करण्यात आल्याचा तसेच फिर्यादी राणी राठोड यांनाही मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जखमी यशोदा राठोड यांना तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज (15 जुलै) सकाळी सुमारे 6.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार डोक्यावर बोथट वस्तूचा मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक अभिप्रायात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 292/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) (खून) ची वाढ करण्यात आली असून, न्यायालयात अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात सुभाष लष्करे, मंदाकिनी सुभाष लष्करे, विश्व सुभाष लष्करे आणि ईद्र सुभाष लष्करे (सर्व रा. वडारवस्ती, चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
