अंबाजोगाई प्रतिनिधी:- पालखी सोहळा दिनांक 17 जुलै 2026
अंबाजोगाई येथे गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असताना दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), बीडच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आणत तब्बल 59 ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 जुलै 2026 रोजी गजानन महाराज पालखी सोहळ्यात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भाविकांच्या गळ्यातील सोन्याची चैन व मिनी गंठण चोरून नेले होते. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 290/2026 व 293/2026 असे भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात यश आले.
गुन्हा क्रमांक 290/2026 मध्ये चोरीस गेलेली 48 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आरोपी विशाल संजय हातागळे (वय 28) व दत्ता विजय गायकवाड (वय 26, दोघेही रा. गांधीनगर, नाळवंडी रोड, बीड) यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून सदर सोन्याची चैन जप्त करण्यात आली.
तर गुन्हा क्रमांक 293/2026 मध्ये चोरीस गेलेले 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आरोपी अशोक बबन जाधव (वय 29, रा. शास्त्रीनगर, नाळवंडी रोड, बीड) याने चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडूनही चोरीस गेलेले मिनी गंठण जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण 59 ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, त्यामुळे पालखी सोहळ्यातील दोन्ही चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड), पोलीस निरीक्षक शरद जोगदंड (अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, रामचंद्र केकान, सचिन सानप, सोमनाथ गायकवाड, गोविंद भताने, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, चालक अतुल हराळे तसेच पांडुरंग काळे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
